Career In Medical and Paramedical field -मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रांतील करिअर संधी

 


मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रांतील करिअर संधी

विद्यार्थी व पालकांनी करिअरसंबंधी निर्णय घेताना '


मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रातील संधी' व त्याचबरोबर आव्हाने यांचा सांगोपांग विचार करणे हितावह आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. डॉक्टर, दंततज्ज्ञ, वैद्य, फिजिओथेरपिस्ट, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट इत्यादींची समाजाला आरोग्यसेवा मिळण्यासाठी गरज आहे.

 

मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी दहावीनंतर अकरावीता विज्ञान शाखा निवडावी लागते. फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी विषय आवश्यक असतात. महाविद्यालयीन शिक्षणाच्या या टप्प्यावर पालकांनी विद्यार्थ्यांची अॅप्टिट्यूड टेस्ट (कलचाचणी) करून घेतल्यास करिअरची योग्य दिशा व नियोजन करणे सुलभ होते.

 

डॉक्टर होण्यासाठी पेशाची आवड व कष्ट करण्याची मानसिकता असणे आवश्यक ठरते.

NEET  प्रवेश परीक्षेचे महत्व

बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण व राष्ट्रीय स्तरावरील हीट (NEET) परीक्षेच्या गुणवत्तेवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. नॅशनल मेडिकल कमिशन (पूर्वीची मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया) या परीक्षांचे आयोजन करतात. मान्यताप्राप्त शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून वैद्यकीय शिक्षण पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

MBBS कोर्स विषयी थोडक्यात

आधुनिक वैद्यकक्षेत्रात (अॅलोपॅथी) बॅचलर ऑफ मेडिसीन अॅण्ड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) हा साडेचार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम असून एक वर्षाची इंटर्नशिप आहे. प्रथम वर्षाला अनॉटॉमी, फिजिऑलॉजी व बायोकेमिस्ट्री हे विषय अभ्यासावे लागतात. द्वितीय वर्षाता पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्मकॉलॉजी, फॉरेन्सिक मेडिसीन, कम्युनिटी मेडिसीन हे विषय असतात. तृतीय वर्षाता ऑप्पॅल्मॉलॉजी, इएनटी (कान, नाक, घसा शास्त्र) मेडिसीन सर्जरी, ऑब्स्टोट्रिक्स व गायनॅकॉलॉजी, पेडिअॅट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स इत्यादी विषय अभ्यासक्रमात आहेत.

एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर प्रवेशपरीक्षा नीट पी. जी.  एम.डी. / एम.एस. विषयी थोडक्यात

एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर प्रवेशपरीक्षा नीट पी. जी. च्या गुणवत्तेनुसार पदवीव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवता येतो. स्पेशालिस्ट बनण्यासाठी एम.डी. / एम.एस. हे तीन वर्षाचे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसचे ही एन.बी. पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

'सुपरस्पेशलिटी नीट'ची परीक्षा देऊन डी.एम./एम.सी. एच. हे अतिविशेषोपचार (सुपर स्पेशॅलिटी) अभ्यासक्रम निवडता येतात. काही मोजक्याच वैद्यकीय महाविद्यालयात हे अभ्यासक्रम उपलब्ध असून या जागाही मर्यादित आहेत. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तीव्र स्पर्धा, विस्तृत अभ्यासक्रम व दीर्घकालीन अभ्यास करण्याची क्षमता यांचा कस लागतो. म्हणूनच करिअरचा निर्णय घेताना आवड लक्षात घ्यावी. भारतात वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर 'मेडिकल काऊन्सिल'चा परवाना मिळतो, पण परदेशात (उदा. चीन, रशिया इ.) वैद्यकीय शिक्षण घेतल्यास भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी 'फ्रॉईन मेडिकल ग्रॅज्युएट टेस्ट' परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायासाठी प्रचंड खर्च व प्रॅक्टिस सुरू राहण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. शासकीय नोकरी किंवा कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी हे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.

 

अॅलोपॅथीव्यतिरिक्त आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच युनानी विषयी थोडक्यात

अॅलोपॅथीव्यतिरिक्त आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच युनानी या पॅथींचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडता येतात.

आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयातून बीएएमएस (साडेचार) + १ वर्ष इंटर्नशीप असा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

बी.डी.एस. कोर्स विषयी थोडक्यात

दंततज्ज्ञ म्हणून करिअर करण्यासाठी चार वर्षांचा बी.डी.एस. अभ्यासक्रम असून एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. त्यानंतर एम.डी.एस.चे पदवीव्युत्तर शिक्षण घेता येते. सध्या समाजात जागरूकता वाढत असल्यामुळे दंततज्ज्ञांना स्वतंत्र व्यवसाय किंवा नोकरी हे पर्याय निवडता येतात.


फिजिओथेरपिस्ट म्हणून करिअर:-

मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बी.पी.टी. एच. हा पदवी अभ्यासक्रम शिकून फिजिओथेरपिस्ट म्हणून करिअर निवडता येते. फिजिओथेरपीमध्ये सुद्धा एम.पी.टी. एच. हा स्पेशलायझेशनचा भौतिकोपचार अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.

अॅक्युपेशनल थेरपिस्टचा म्हणून करिअर:-

तसेच निवडक महाविद्यालयांतून बीओटीएच हा अॅक्युपेशनल थेरपिस्टचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी बी.ए.एस.एल.पी.चा अभ्यासक्रम निवडता येतो. काही विशिष्ट संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

 

बी.एस.सी. (ऑप्टोमेट्री) बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बी.पी.एम.टी.)

ऑप्टोमेट्रिस्ट हे करिअर निवडण्यासाठी बी.एस.सी. (ऑप्टोमेट्री) हा अभ्यासक्रम निवडक संस्थांतून उपलब्ध आहे.बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बी.पी.एम.टी.) हा नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमधून उपलब्ध आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कॅथलॅब टेक्निशिअन डायलिसिस टेक्निशिअन ऑपरेशन थिएटर, रेडिऑलॉजी टेक्निशिअन इ. अभ्यासक्रम बारावी विज्ञानशाखा उत्तीर्ण झाल्यावर गुणवत्तेनुसार उपलब्ध आहेत.

बी. एस. सी. (नर्सिंग):-

नर्सिंग क्षेत्रात बी. एस. सी. (नर्सिंग) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे पदवीव्युत्तर एम. एम. सी. नर्सिंग तसेच पी. एच. डी नर्सिंग हे अभ्यासक्रम निवडक महाविद्यालयातून उपलब्ध आहेत. मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रातील या संधी सेवा संशोधन तसेच शिक्षण या विविध पातळ्यांवर लब्ध आहेत. मेडिकल व पॅरामेडिकल क्षेत्रातील या संधी शोधताना आव्हानांचाही ऊहापोह करणे गरजेचे वाटते. सर्व अभ्यासक्रम ज्ञानाधिष्ठित आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करताना व नंतरही अनुभव हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून कलचाचणी योग्य वेळी करून समुपदेशनाने आवड निवड लक्षात घेऊन करिअरचा निर्णय पालकांनी घ्यावा. केवळ पालकांची इच्छा म्हणून पाल्यांना मेडिकल क्षेत्रात जबरदस्तीने पाठवू नये. इंजिनीअरिंग व इतर कला, वाणिज्य इ. क्षेत्राशी तुलना करता मैडिकल अभ्यासक्रम दीर्घकालीन आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्याला समाधान देणारे करिअर निवडावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees